प्रतिनिधी ओम मोरे
अमरावती : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाते, ती जागा म्हणजे स्मशानभूमी. अनेकांच्या मनात २१ व्या शतकातही स्मशानभूमी बद्दल विविध गैरसमज, भीती आणि दहशत आजही बघायला मिळते. त्यामुळे अनेकजण स्मशानभूमीत जाणे टाळत असतात. आजही महिला स्मशानभूमीमध्ये जाण्याची हिंमत करत नाहीत. पण, वरुड तालुक्यातील हतुरणा गावात मात्र एक वेगळे चित्र आपल्याला बघायला मिळते.

या गावातील स्मशानभूमीत लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वांचा तिथे मुक्त वावर असतो. स्मशानभूमीला येथील ग्रामस्थ रमणीय ठिकाण समजतात. दिवसभर येणाऱ्या-जाणाऱ्यांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. येथील स्मशानभूमीत गेल्यास एखाद्या छोट्या पर्यटनस्थळी आल्याचे समाधान मनाला वाटते. आणि त्याचे कारणदेखील तसेच आहे.

अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीच्या तीरावर अमरावती जिल्ह्यातील हा हातूरणा हे शेवटचे गाव आहे. या पूर्वी गावातील स्मशानभूमी वर्धा नदी पात्रात होती. दोन दशकांपासून वर्धा नदीवर अप्पर वर्धा धरणाची निर्मिती झाल्यानंतर, नदीच्या तीरावर दोन ते तीन एकर जागेवर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून या स्मशानभूमीची पायाभरणी करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
