दर्यापूर – महेश बुंदे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत सरसकट बंद करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अनाकलनीय असल्याचे शिक्षणतत्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ऑनलाइन शिक्षण सगळ्यांसाठीच सोयीचे नसून यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शिक्षण खंड पडेल, अशा भावना शिक्षण तत्ज्ञांकडून व्यक्त केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा समोर आल्या आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेणे, हाच शिक्षणाचा योग्य मार्ग असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, तसेच गणित, विज्ञान यासारख्या विषयाच्या आकलनात उणिवा राहणार असल्याचेही ते अधोरेखित करीत आहेत. विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट करून शिकविणे, अभ्यासक्रमावर आधारित कृती पुस्तिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, किमान आवश्यक तेवढा अभ्यासक्रम शाळेमध्ये पूर्ण करून घेणे अशा पर्यायाची चाचपणी न करता सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अपायकारकच असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया —
शिक्षणाच्या प्रवाहापासून विद्यार्थी दूरावण्याची शक्यता आहे. लेखन, वाचन, ज्ञानग्रहण क्षमता कमी होताना दिसत आहे. चित्रपट क्षेत्र धार्मिक जागा, मॉल, हॉटेल या सर्वांना ५० टक्के उपस्थितीत परवानगी असताना शाळा सरसकट बंद का, ऑनलाइन शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांना घेता येणार नाही यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
- सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती
