अनाथांची माई म्हणजेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आरोग्य चिंताजनक असल्याची बातमी व नंतर दु:खद निधन झाल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये आली. सर्वसामान्य जनता स्तब्ध झाली व अचानक आलेल्या बातमीमुळे मराठीजण व देशवासीयांना धक्काच बसला. वास्तविक महिन्यांपासून आजारी असणा-या माईंच्या आजारपणाबद्दल व तब्बेतीबाबत प्रसारमाध्यमांनी बातमी केलेली नव्हती.
सिने अभिनेते यांना वा त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लागण होताच बातम्यांची शृंखला सुरू होते व बारीकसारीक तपशील दिले जातात. तिचं स्थिती सिने कलाकारांच्या प्रेमप्रकरणांची, लग्नाची, जेल वारीची स्थिती असते. प्रसारमाध्यमांनी कोणत्या बातमीला किती महत्त्व द्यावे हा त्यांचा अधिकार आहे, पण सामान्यांनीही आता कोणती बातमी बघावी हे ठरवायला हवे.
प्रसारमाध्यमे ही टि.आर.पी. या नाथाच्या मर्जीवर चालतात असेच चित्र दिसत आहे. टि.आर.पी. या नाथाच्या आशिर्वादाने जाहिरातींची भेट भेटते व त्या जहिरातींवरच प्रसारमाध्यमांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. मात्र आता अनेक इतर समाज माध्यमे मोबाईल मध्ये उपलब्ध झाली असून आपल्याला काय पहायचे व काय पहायचे नाही याचे स्वातंत्र्य उपलब्ध आहे.
टि.आर.पी. या नाथापेक्षा ही बातमीचे दर्शक हे मोठे नाथ आहेत. कोणत्या बातमीला महत्व द्यायचे हे ते आता ठरवू शकत आहेत. सामाजिक चळवळ, सामाजिक प्रश्न, सामाजिक भावना व सामाजिक कार्यकर्ते यांना न्याय देणाऱ्या बातमीदारीतेला आद्य पसंतीक्रम देणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. कोणतीही सर्वसामान्य जनतेशी व समाजाशी निगडीत बातमी अनाथ होणार नाही व आपण तिचे नाथ होणे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.
