दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूरातील ड्रिमलॅड सिटी येथे राहणारे शिक्षक प्रकाश लिंगोट हे जिल्हा परिषद हायस्कूल सैदापुर येथे कार्यरत आहेत. त्यांना मधुमेह आणी रक्तदाबाचा आजार सुरू झाला होता. यावर डाॅक्टरानी त्यांना औषधोपचारासोबतच सायकल चालवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी २०१६ पासून सायकलींगचा छंद जोपासला आहे. गत वर्षभरात २१०० किलोमीटर अंतर पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
हा छंद जोपासण्यासाठी त्यांनी सायकल विकत घेतली आणि व्यायाम म्हणून दररोज सायकलिंग करणे हा त्यांचा आवडीचा छंद बनला, कुठेही जायचे असले तर ते सायकलनेच जायचे, हा छंद त्यांचा वाढत वाढत जाऊन दररोज ५० ते ६० किलोमीटर सायकलिंग करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले. नोकरीनिमित्त बाजूच्याच अंजनगाव तालुक्यात सुद्धा ते सायकलने जायचे. हा छंद जोपासत असताना त्यांनी आज ३१ डिसेंबर २०२१ ला २१०० किलोमीटर सायकलिंगचे उद्दिष्ट गाठले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, हे उद्दिष्ट साध्य करत असताना दोन वर्षांपूर्वी त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा भयंकर त्रास जाणवत होता त्यासंबंधात त्यांच्या नियमित औषधोपचार सुद्धा सुरू होता. सायकलींगचा छंद जोपासल्यानंतर त्यांना त्यांच्या आजारांमध्ये सुधारणा होत असल्याचे जाणवले यातून त्यांना बरे वाटू लागले. यानंतर त्यांनी मधुमेह आणि रक्तदाब यासंबंधातील औषधे हळूहळू कमी करत कायमची बंद केली.

या संबंधात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील त्यांनी घेतला आणि आश्चर्य ते काय सायकलिंगचा छंद जोपासल्यामुळे त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाच्या नियमित औषधांपासून कायमची सुटका मिळाली या त्यांचा छंदामुळे आरोग्य विषयक लाभ तर झालाच याशिवाय दर्यापूर तालुक्यात २१०० किलोमीटर सायकलिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठणारे ते एकमेव ठरले आहेत. या संबंधात दर्यापुरातील अनेक समाजसेवी संस्थांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल प्रकाश लिंगोट यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला आहे. त्यांच्या या छंदापासून प्रेरणा घेऊन अनेक मधुमेह आणि रक्तदाबच्या आजाराने ग्रस्त असणारे यांनी सुद्धा आता सायकलिंग सुरू केली आहे.
प्रतिक्रिया ——-
गेल्या दोन वर्षापूर्वी मला रक्तदाब आणि मधुमेह याच्या नियमित गोळ्या सुरू होत्या सायकलिंग सुरू केल्यापासून मला त्यात सुधारणा वाटली हळूहळू त्या आजारातून मला बरे झाल्याचा आवाज निर्माण झाला व मी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू औषधे कमी करत आज रोजी मला कोणत्याही गोळ्या घ्याव्या लागत नाहीत सायकलिंगमुळे हा मोठा फायदा मला झाला आहे.
— प्रकाश लिंगोट, शिक्षक