पुण्यात भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना, कोरेगाव भीमाच्या शौर्यदिनाला 204 वर्ष पूर्ण, जाणून घ्या आढावा

पुणे वार्ता :- आज कोरेगाव भीमामध्ये 204 वा शौर्यदिन साजरा करण्यात आला. जानेवारी 1818 या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ.स्टाटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या 500 सैनिकांनी 28,000 पेशवा सैन्याचा पराभव केला. 1 जानेवारीला भीमा कोरेगाव साजरा करण्यात येतो.महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला मानवंदना दिली.

भीमा कोरेगावची लढाई म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेल्या पहिला बंड होता आणि त्याच लढाईत महार समाजाला यश मिळाले म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाची आठवण म्हणून अजूनही आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला भेट देतात.महार सैनिकांचा उद्देश हा इंग्रजाना युद्ध जिंकून देण्यापेक्षा जाचक पेशवाईलाचाप बसवण्याचा मुख्य ऊद्देश होता,अशी माहिती इतिहासकार देतात.

मध्यरात्री 12 वाजता बुद्धवंदना करण्यात आली. यावेळी विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .204 वा शौर्यदिन साजरा करताना विविधरंगी फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. मध्यरात्रीपासून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.

राज्यातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते.

कोरेगाव भीमा येथे जे शूरवीर शहिद झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात रहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल. स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आधी सुविधा करण्यास शासनाचे प्राधान्य राहील असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाचा नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे.पाश्चात्य देशात प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत.आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

शौर्य दिनाला येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुयायांना जयस्तंभास सुलभतेने अभिवादन करता यावे यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केले होते. पीएमपीएल तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मूलभूत सोयी सुविधा , सुशोभिकरण आणि अन्य विकासाची तसेच शौर्य दिन तसेच दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन आणि नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. तर या परिसराचा विकास आणि सुशोभीकरणासाठी समिती गठित करण्यात आली आहे.

या स्थळाचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंतचा बृहत विकास आराखडा तयार करण्यात आलाय. दरम्यान, विजयस्तंभ आणि परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या मार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30 टक्के निधी तातडीने वितरित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बृहत विकास आराखड्यासाठी समिती

बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली.याशिवाय एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच वढू बुद्रुक -तुळापुरचे विकास करून चित्र पालटणार आहे.

माहिती पुस्तकाचे वाटप :- कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे व पेरणे गावचे सरपंच रुपेश ठोंबरे यांच्यासह उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ,ग्रामसेवक गुलाब नवले, कानिफनाथ थोरात, शिक्रापूर पोलीस आणि बार्टीच्या वतीने आंबेडकरी अनुयायांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच त्यासाठी लागणारे कागदपत्रे यांचे मार्गदर्शन करून त्यांना माहिती पुस्तकेचे वाटप करण्यात आले.

या दिवशी विजय स्तंभ परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दल 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करणार आहे.या बंदोबस्तामध्ये दोन अपर पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, 13 सहाय्यक आयुक्त, 53 पोलीस निरीक्षक, 130 सहाय्यक निरीक्षक, 1950 अंमलदार, 700 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या, दहा बॉम्बशोधक व नाशक पथक, 6 जलद कृती दलाचे पथके, 5 दंगल नियंत्रक पथके असा बंदोबस्त यांच्यासह तब्बल पाच हजार पोलिस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!