पुणे वार्ता :- चाकण शहरातील चाकण पोलीस ठाण्यात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत 85 हजारांची लाच घेताना एकाला रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने पिंपरी- चिंचवड पोलीस दलात यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसात आलेली तक्रार न स्वीकारण्यासाठी ही लाच देण्यात येत होती. अशी माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे. अखत्तर शेखावत अली शेख (वय 35), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि.२९) रात्री पोलिस ठाण्यातच कारवाई केली
अशी केली कारवाई
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 27 वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली होते. चाकण पोलीस स्थानकात तक्रार आली होती. मात्र तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी 70 हजारांची लाच मागितली होती. यानंतर आरोपी शेख याने उपनिरीक्षक यांच्यासाठी 70 हजार तर स्वत:साठी 15 हजार रुपये, असे एकूण 85 हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली. याबाबत तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.तरुणाच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी शेख याला 85 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.
कुणी राज्य शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधिक्षक (प्रशासन) श्रीहरी पाटील यांनी केले आहे.