आरोपींना पकडायला गेलेल्या पोलीस पथकावर गोळीबार, कोये येथील घटना

चाकण वार्ता :- पिंपरी चिंचवडमधील खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस आणि आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांच्यात अर्धा तास चकमक सुरू होती. आरोपींसोबत झालेल्या झटापटीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अमृतकर यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा दहा गोळ्या झाडून योगेश जगताप नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. मात्र याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण फरार होते. या दोघांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. गणेश मोटे आणि अश्विन चव्हाणचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंड स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जगतापच्या खून प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारे आरोपी गुंड गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस घेत होते. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास हे तिघे चाकण परिसरातील कोये कुरकुंडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, हरीश माने हे त्या ठिकाणी गेले होते.

दरम्यान, (18 डिसेंबर )आठ दिवसांपूर्वी गजबजलेल्या काटे पुरम चौकात तडीपार गुंड गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण या दोघांनी अचानक गोळीबार करत योगेश जगतापचा खून केला होता. या घटनेमुळे अवघे शहर हादरले होते. भर चौकात दहशत निर्माण करत गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांनी पिस्तूलातून अंदाधुंद १० ते ११ गोळ्या झाडल्या होत्या. यात योगेश जगताप (36, रा. पिंपळे गुरव) याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली अन आरोपींचा शोध सुरू होता.

दरम्यान, चाकण येथिल कोये कुरकुंडी परिसरातील एका टेकडीवर हे आरोपी लपून बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला आहे. पोलिसांनी देखील चोख प्रतिउत्तर देत गोळीबार केला. ही चकमक अर्धा तास सुरू होती. अखेर आरोपींकडील दोन्ही पिस्तूलातील गोळ्या संपल्या. त्यानंतर, गोळीबार शांत होताच पोलिसांनी लपून बसलेल्या गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे किरकोळ जखमी झाले आहेत.

गणेश हनुमंत मोटे (वय 23, रा. सांगवी, मुळ रा. वैराग ता मोहोळ जि. सोलापूर), महेश तुकाराम माने (वय 23, रा. कवडेनगर सांगवी पुणे मुळ रा. पाठसांगवी ता. भुम जि. उस्मानाबाद), अश्विन आनंदराव यादव (वय 21, रा. काटेपुरम चौक विनायकनगर नवी सांगवी मुळ रा, श्रीपत पिंपरी ता बार्शी जि. सोलापुर) यांना अटक केली आहे.

आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल

पोलिसांवर गोळीबार , विनापरवाना शस्त्र बाळगले याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार तीनही आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 307, 353, 34, सह आर्म ॲक्ट 3 (25) (27) सह मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वरील तिघेही आरोपी चाकण पोलिसांच्या ताब्यात आहेत

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!