सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न
दर्यापूर – महेश बुंदे
देशाच्या व्यवस्थेत बदल करायचा असेल तर ग्रामीण भागातून राजकीय व प्रशासकीय नेतृत्व निर्माण झाले पाहिजे, असे प्रतिपादन वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे संचालक व सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे प्रा. नितेश कराळे यांनी केले ते दर्यापूर येथील सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दि ५ डिसेंबर रोजी शहरातील शेतकरी सदन येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रम निमित्ताने बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवा यामुळे मागे राहतो, पण आपली भाषा, आपली जीवनशैली हेच आपल्या यशाचे खरे कारण असू शकते असे ते म्हणाले. या देशाला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता बनवायचे असेल तर युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अभ्यास करून पुस्तकी ज्ञान प्राप्त न करता, आपल्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठवला पाहिजे, त्यामुळे शासकीय यंत्रणेत बदल होईल आणि हा देश महासत्ता होईल, असे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवावे तरच आपल्याला या क्षेत्रात यश मिळेल आणि अपयशामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न केले तर यश आपल्या पायावर लोटांगण घेईल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

अनेक उदाहरण देत ग्रामीण भागातील त्याच्या अनोख्या शैलीत त्यांनी जवळपास अडीच तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, आपल्या आयुष्याचा प्रवास सुद्धा सांगितला व स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मराठी भाषेचे आपल्या ग्रामीण वऱ्हाडी शैलीत अभ्यासासाठी अनोखी पध्दत सांगितली, त्यामुळे विद्यार्थी यांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद प्रा. नितेश कराळे सरांना यावेळी दिला. यावेळी दर्यापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले ऋषभ मानकर, आयआयटी करीता निवड झालेले मयूर कदम, एमबीबीएस करीता निवड झालेली वैष्णवी ठाकरे, दिल्ली येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केलेले स्वप्नील वरूडकर, ज्योदो खेळाडू दर्शन शेरेकर, राम जळमकर, टायकांडो खेळाडू शिवम गुजर, किक बॉक्सिंग खेळाडू प्रज्वल तायडे, कराटे खेळाडू शारदा खंडारे, योगापटू श्रध्दा जऊळकार, युवा बेरोजगार स्ट्रॉल सुरू करणारे राहुल व चेतन वाघमारे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
