पात्र लाभार्थी आणि प्रकल्पबधितांना घरांचे वाटप सुरू करण्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्तांना निर्देश…
डोंबिवलीमधील दत्त नगर बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांचे पुनसर्वेक्षण होणार
कल्याण- डोंबिवली मनपाने राबवलेल्या बीएसुपी योजना अंतर्गत ७ हजार २७२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यातील १ हजार ९९५ पात्र लाभार्थ्यांना या घरांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ४ हजार ५०० घरे बांधून पूर्ण झाल्याने ही घरे रस्ते आणि इतर प्रकल्पातील बाधितांना विनामूल्य देण्याची आग्रही मागणी करत सातत्याने श्रीकांत शिंदे हे पाठपुरावा करत होते . अखेर कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत राबवण्यात येणाऱ्या बीएसयुपी योजनेतील घरे पात्र लाभार्थ्यांना देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आज यासंदर्भात नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेली घरे घरकुल योजनेचे लाभार्थी आणि रस्ते प्रकल्पातील बाधितांना विनामूल्य देण्याचे निर्देश श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले.
तसेच डोंबिवली येथील दत्तनगरमध्ये राबविण्यात आलेल्या बीएसयुपी योजनेत एकूण ४३६ पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ २६ जण पात्र ठरल्याने अनेक लाभार्थी घरे मिळण्यापासून वंचित राहिले असल्याने या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी अधिवासाच्या पुराव्यांचे पुनसर्वेक्षण करून ज्यांच्याकडे अधिवासाचा एखादा तरी पुरावा उपलब्ध आहे, अशा लोकांना पात्र ठरवून त्यानंतर या घरांचे वाटप करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी मनपा आयुक्तांना दिलेत. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बैठकीस कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मा.महापौर विनिता राणे, उप-जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उप-जिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, मा.नगरसेवक रमेश म्हात्रे, मा.नगरसेवक दीपेश म्हात्रे, मा.नगरसेवक विश्वनाथ राणे उपस्थित होते.