प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यातील काही गावातील कोविड लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान लसीकरण केंद्रावर गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजनातून काम करीत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व पात्र व्यक्तींना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सट्टीच्या दिवशी सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.आज19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी काही केंद्रांना आकस्मिक भेट दिली. मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा, शिवणी व आसेगाव (पो.स्टे) आणि कारंजा तालुक्यातील पोहा व काजळेश्वर आणि कारंजा शहरातील दारव्हा वेस येथील लसीकरण केंद्राला भेट दिली असता, काही लसीकरण केंद्रावर ड्युटी असलेले काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. या गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
