Post Views: 706
रेल रोको कृती समितीचे खासदार तडस यांना निवेदन
सर्वात पहिले महाराष्ट्र एक्सप्रेस चा थांबा होणार पुर्वरत ?
चांदूर रेल्वे – (शहर प्रतिनिधी धिरज पवार)
चांदूर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात यावा या मागणीचे निवेदन रेल रोको कृती समितीतर्फे वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांना वर्धा येथे त़्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आले. तर सगळ्यात पहिले चांदूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस चा थांबा पुर्वरत सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चांदूर रेल्वे स्टेशन वर कोरोना च्या पूर्वी एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा होता. मात्र कोरोना नंतर सदर गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला. एक्सप्रेस गाड्या चांदूर रेल्वे स्थानकावर थांबत नसल्याकारणाने रेल रोको कृती समितीच्या वतीने रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन केले तसेच दहा फुटांचे भव्य कुलूप भेट दिले होते.
याशिवाय विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपुर (डीआरएम) यांनासुद्धा कृती समितीचे पदाधिकारी भेटले. परंतु अद्यापही रेल्वेगाड्यांचा थांबा पूर्ववत झाला नाही हे दुर्दैवच असल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले. आसपासचे व जवळपास सारखेच भौगोलिक परिस्थिती असणारे मुर्तीजापुर, धामणगाव या रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या थांबतात. मात्र चांदूर रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्सप्रेस व्यतिरिक्त कोणतीही गाडी थांबत नाही. हा चांदूर रेल्वे सह नांदगाव व तिवसा तालुक्यातील नागरिकांवर मोठा अन्याय आहे. रेल्वेचा थांबा पूर्ववत करण्यात यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन रेल रोको कृती समितीच्या वतीने खासदार रामदास तडस यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, सदस्य महेमुद हुसेन, विनोद जोशी, मदन कोठारी, बंडूभाऊ यादव यांची उपस्थिती होती.