कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक निवडणूक निकालाच्या दिवशीच थोरात यांनी राजीनामा दिला होता. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता, मात्र थोरात हे निवडणुकीच्या दरम्यान कुठेच नव्हते. शुभांगी पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही निवेदन प्रसिद्ध केले नाही. त्यांनी तांबेला मदत केल्याचा आरोप केला जात आहे.
कालपर्यंत कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाल्यानंतर थोरात यांच्याकडे विधिमंडळ पक्षाचे नेतेपद ठेवायचे किंवा कसे याबाबत निर्णय होऊ शकतो अशी अटकळ बांधली जात होती. पण त्याआधीच थोरात यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील कलह आणखीनच उफाळण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. थोरात यांनी आधी पटोलेंसोबत काम करणे शक्य नसल्याचे सांगत आपला भाचा तांबेचे अभिनंदन केले होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.