Post Views: 487
कानिफनाथ महाराज यात्रा निमित्ताने १२-१३ मार्चला लेंगी ऊत्सव
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील तीर्थक्षेत्र सावरगाव कान्होबा येथे अखिल भारतीय स्तरावर गोर बंजारा लेंगी स्पर्धेचे आयोजन ग्रामवासीयांतर्फे करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट पाच लेंगीमंडळांना हजारो रुपयांच्या बक्षिसांचे वितरण या लेंगी महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
लेंगी या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. गोरबोलीत त्याला पायी घालने असे म्हणतात.पायी म्हणजे पायाने डफड्यांच्या ठेक्यावर नृत्य करणे होय. होळीच्या सणाचे औचित्य साधून आपल्या शेतीवाडीचे संपूर्ण कामधंदे आटोपून, शेतीमातीची उलंगवाडी, वृक्षवल्लींची पानझड झाल्यानंतर तांड्यातील गोरबांधव गायनाच्या ठेक्यावर या धम्माल नृत्याची उधळण करतात.
लेंगी या वैशिष्ट्यपूर्ण धमाल नृत्याच्या सार्वत्रिकरणाची अफलातून संकल्पना गाववाशी स्पर्धेच्या माध्यमातून सावरगावात कानिफनाथ महाराज यात्रेनिमित्ताने प्रत्यक्ष अंमलात आणत आहेत. सावरगाव येथे बंजारा बांधव बहुसंख्येने आहेत.इतरही जातीचे लोक येथे वास करतात. या सर्वांना एका सूत्रात बांधून एक दिलाने राहणे, वागणे,गावाचे मुख्य वैशिष्ट्य किंबहुना स्थायीभाव आहे.बंजारा समाजातील नानाविध गुणवैशिष्ट्यांनी भरलेला लेंगीउत्सवाचा वारसा अनादी काळापासून आधारित कड्याकपारीत राहणारा बंजारा समाज आजतागायत मौखिकदृष्ट्या सांभाळत आलेला आहे. पूर्वजांचा महान सांस्कृतिक ठेवा जपत आलेला आहे. गोरबोलीतील हा सांस्कृतिक खजिना अनेक परंपरांनी नटलेला आणि थटलेला आहे.
सावरगाव येथील या लेंगी महोत्सवाच्या आयोजनामागची मुख्य भूमिका म्हणजे सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, जागरण होय.यातील विषय सुद्धा जागृतीपर असतात. युगप्रवर्तक सेवालाल महाराजांची शिकवण, रामरावबापू यांचे जीवनचरित्र हरितवत्सल वसंतराव नाईक यांचे सामाजिक विविध कार्य, त्याचबरोबर समाजातील तीजोत्सव, दिवाळीगीत, होळीगीत, धुंडविधी इ. बाबींवर जागरण नृत्याविष्काराची धमाल स्पर्धेदरम्यान चालणार आहे.
विश्वातील अनेक रंगांच्या मिलाप म्हणजे गोर पोशाख आणि वेशभूषा होय.ही वेशभूषा गोर महिलांचा साज-शृंगार, चकाकणारी अलंकार, आभूषणे,कौडी, पैंजण,हातातील लटकण,पाटली,सोन्या-चांदीचे गळ्यातील गंठण,नाकातील नथ, विविध प्रकाराने गुंथन केलेली कंचुकी, लहंगा,ओढणी कित्येक बाबींचा भरीव, बहारदार असा पोषाख, त्याप्रमाणे पुरुषांची धोती, पागोटे, नक्षीकाम केलेला अंगरखा, अनेक रंगी शेले, पायातील घुंगराची ची चाळ, डफड्यावरील नृत्य भल्याभल्यांना लेंगी स्पर्धेदरम्यान थिरकायला लावणार आहे.जो समाज शेकडो वर्षे झाडी, जंगलात राहिला.वृक्षवल्ली, वनचरे,गाईगुरांच्या समवेत, व्यापार, अन्नधान्य संसाराच बाजारबुणग सोबत घेऊन शेकडो वर्ष रानोमाळा भटकंती करीत होता. शेकडो वर्ष गावकुस या वैभवशाली, गौरवशाली समाजाला पाहावयास मिळाले नाही.
तो समाज आज एकविसाव्या शतकातील संगणक, डॉल्बी,डिजिटल युगात लेंगी महोत्सव घेतो आहे ही म्हणावी तेवढी सोपी बाब नाही. याचे संपूर्ण श्रेय सावरगाव येथील लेंगी स्पर्धा आयोजक बंजारा बांधव अभिनंदनास पात्र आहेत.