ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भंडार्ली गावात प्रस्तावित असलेल्या घनकचरा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या १४ गाव संघर्ष समितीतील सदस्यांशी ठाणे तसेच गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी संवाद साधून त्यांचं म्हणणं सविस्तरपणे जाणून घेतल.
भंडार्ली गावात राबविण्यात येणारा प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपात राबविण्यात येणार असल्याबद्दल ग्रामस्थांची त्यांनी समजूत घातली. तसेच याठिकाणी कोणतेही कचऱ्याचे डम्पिंग होणार नसून शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करणारा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेने डायघर येथे संपूर्णपणे अद्ययावत पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याबद्दल सांगितले तसेच या प्रकल्पाचा पहिला टप्पा सहा महिन्यात तर दुसरा टप्पा वर्षभरात सुरू करण्यात येणार असल्याने त्यानंतर भंडार्लीमध्ये कचरा टाकण्याची गरज उरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रक्रिया प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी, रोगराई पसरणार नसल्याचे सांगून त्याबद्दल देखील ग्रामस्थांना हमी दिली तसेच १४ गावातील ग्रामस्थांना पायाभूत सुविधांबाबत असलेल्या सर्व समस्या पूर्णपणे दूर करण्याबाबत देखील त्यांना आश्वस्त केले. यानंतर पुढील सात दिवसात १४ गावांतील ग्रामस्थांशी बोलून याबाबत निर्णय घेऊ असे सांगून ग्रामस्थांनी देखील त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, ठाणे पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकारी आणि १४ गाव संघर्ष समितीचे सर्व प्रमुख सदस्य आवर्जून उपस्थित होते.