कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम : कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केला आहे.

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने https://mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक आहे. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

अर्जदारास हे सहाय्य मिळण्यासाठी कोविड- 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकांनी राज्य शासनाने याकरीता विकसीत केलेले https://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSP-SPV मधून अर्ज करु शकतात. अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे/ माहिती सादर करणे बंधनकारक राहील. अर्जदाराचा स्वत:चा तपशिल, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक खाते तपशिल, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशिल, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू अधिनियम 1969 मधील मृत्यू प्रमाणपत्र व इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असलेले स्वयं घोषणापत्र आदी कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.

केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.
अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदारांच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!