प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:- जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. सर्वच पात्र व्यक्तींचे निर्धारित वेळेत 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनाने सर्वच व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आता लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी आज 3 डिसेंबर रोजी मानोरा तालुक्यातील कुपटा आणि दापुरा येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण कर्मचारी व लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. आतापर्यंत दोन्ही लसीकरण केंद्रावर किती व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले या बाबतची माहिती त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली. ज्या पात्र व्यक्तींनी अद्यापही लस घेतली नाही,त्यांना लसीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित करावे,असे श्री षण्मुगराजन यांनी सांगितले. तसेच त्यांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी देखील संवाद साधून लसीचे महत्त्व पटवून दिले.तेव्हा ज्यांनी लस घेतली नाही त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.असे श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.
