प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2021 ही परिक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी वाशिम शहरातील तेवीस परिक्षा केंद्रावर सकाळी व दुपारी या दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. परिक्षेच्या कालावधीमध्ये परिक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परिक्षा केंद्राच्या 100 मिटर परिक्षेत्रात फौजदारी प्रक्रीया संहितेची कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहे.
ही परिक्षा वाशिम शहरातील रेखाताई कन्या विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कुल, समर्थ इंग्लिश स्कुल सुंदरवाटीका, विद्याभारती माध्यमिक स्कुल, श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतन, नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, माऊंट कार्मेल स्कुल, सौ. सुशिलाताई जाधव विद्या निकेतन सोनखास रोड, स्वामी विवेकानंद कनिष्ठ विद्यालय रिसोड रोड लाखाळा, शिवाजी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, बाकलीवाल विद्यालय, मुलीबाई चरखा इंग्लीश स्कुल लाखाळा, लॉयन्स विद्यानिकेतन, मालतीबाई सरनाई कन्या विद्यालय बसस्थानक जवळ, नारायणा किडस आणि आर.ए. कॉलेज वाशिम या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पहिला पेपर 4,179 परिक्षार्थी आणि दुसरा पेपर 3,336 परिक्षार्थी हे शिक्षक पात्रता परिक्षेचा पेपर देणार आहे.
